(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या ठिकाणाबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. रायपाटण येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने २३ जून २०२६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या सूचनेद्वारे नागरिक, संस्था आणि संबंधित ग्रामपंचायतींकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
हरकती दाखल करण्यासाठी प्रशासनाने १५ दिवसांचा कालावधी दिला होता. हा कालावधी ७ जुलै रोजी संपला. मात्र, रायपाटण येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया म्हणून नियोजित करण्यात आलेली प्रत्यक्ष सुनावणी घेणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत असल्याची माहिती मिळत आहे.
प्रत्येक हरकतदाराला स्वतंत्र नोटीस बजावून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची संधी देणे शक्य नसल्याने आज, १५ जुलै रोजी राजापूर प्रांत कार्यालयाने रायपाटण येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत हरकत नोंदविणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच सदस्यांना यासाठी बोलावण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या प्रस्तावाबाबत आपली भूमिका मांडली असून, आज मोठ्या संख्येने प्रतिनिधी प्रांत कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रांत कार्यालयाकडून पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
अप्पर तहसील कार्यालय नेमके कोणत्या ठिकाणी स्थापन होणार, याबाबत आता प्रशासनाच्या निर्णयाकडे राजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. रायपाटण, पाचलसह अन्य भागातील ग्रामस्थांच्या हरकती, स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि वरिष्ठ स्तरावरील निर्णय यावर या प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

