(चिपळूण / वार्ताहर)
डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण, मार्गदर्शन आणि प्रेरणादायी संदेशांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिलजी चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास लघु पाटबंधारे विभागाच्या निवृत्त कनिष्ठ अभियंता तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्राची जोशी आणि आंतरराष्ट्रीय रायफल शूटर तथा समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सौ. यशिका सिद्धार्थ निकम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेच्या संचालिका तथा वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे, गोविंदरावजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शामिका चोरगे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन तांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता शिक्षणासोबत शिस्त, संस्कार आणि चारित्र्य जपावे, असे आवाहन केले. महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तिमत्त्व घडविण्याची महत्त्वाची संधी असून विद्यार्थ्यांनी या काळाचा योग्य उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
डॉ. निखिलजी चोरगे यांनी विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सौ. प्राची जोशी यांनी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या गुणवत्तेच्या जोरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगितले.
आंतरराष्ट्रीय रायफल शूटर तथा समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सौ. यशिका निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश संपादन करून उत्तम करिअर घडवू शकतात, असा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, ५९व्या युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या सत्कारामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुप्रिया चौगुले यांनी केले. प्रा. संदिप येलये यांनी प्रास्ताविक केले, तर कु. अनिकेत वलावटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

