(मुंबई / वृत्तसंस्था)
विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील राहुल नगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी तपासासाठी सील केलेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला आज पहाटे अचानक भीषण आग लागली. या आगीत घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण घर जळून खाक झाले. सील केलेल्या घरात आग लागल्याने या घटनेबाबत संशय व्यक्त होत असून, आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास पार्कसाईट पोलीस करत आहेत.
राहुल नगर परिसरात चार सख्खे भाऊ एकाच घरात राहत होते. ६ ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास सुनील विश्वकर्मा (४०) यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावल्याच्या कारणावरून त्यांचे भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी त्यांना जाब विचारला. त्यातून भावांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर सुरेंद्र आणि सूरज यांनी धारदार शस्त्राने सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा गंभीर जखमी झाले होते.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा हे देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले आहे.
सील केलेल्या घराला पहाटे आग
दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून विश्वकर्मा कुटुंबाचे घर सील केले होते. मात्र, आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास याच बंद घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्याचदरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे प्रयत्न केले; मात्र या आगीत घर मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले.
आग अपघाती की घातपात? पोलिसांचा तपास सुरू
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे घर पोलिसांनी तपासासाठी सील केलेले असताना त्याला आग कशी लागली? हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. ही आग अपघाती होती की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
आग लागण्यामागे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, याबाबतही पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र, आग घातपातामुळेच लागली असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आगीमुळे हत्याकांडाशी संबंधित घटनास्थळाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या आगीच्या घटनेचा तपास आता दुहेरी हत्याकांडाच्या तपासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. आग लागण्याचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

