(पुणे)
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबाने राजकीय मैदानात उडी घेतल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली.
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने भवानी पेठ येथील क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, विशेष न्यायालयाने बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी सशर्त परवानगी दिली आहे.
न्यायालयाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली असली, तरी मिरवणूक, प्रचार, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास स्पष्ट मनाई केली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत पोलिसांनी कोणतीही गर्दी न होऊ देता गपचूपपणे बंडू आंदेकरसह लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना क्षेत्रीय कार्यालयात आणले.
पोलीस बंदोबस्तातच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी बंडू आंदेकर याला थेट जेलमधून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणण्यात आले. कोणताही प्रचार, घोषणा किंवा जाहीर सभा न घेता अर्ज दाखल करण्यात आला.
दरम्यान, संभाव्य तणाव लक्षात घेता परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर कुटुंबाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आहे.
बंडू आंदेकर कुटुंबाच्या या राजकीय प्रवेशामुळे पुणे महापालिका निवडणुकीत पुढील काळात काय घडामोडी घडतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

