(मुंबई)
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द परिसरात रविवारी (5 जुलै) रात्री भीषण दुर्घटना घडली. जनता नगर येथील तीन मजली चाळीचा काही भाग अचानक कोसळल्याने 6 लहान मुले, एका महिलेसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. रविवारची सुट्टी असल्याने बहुतांश कुटुंबीय घरातच उपस्थित होते. अचानक चाळीचा काही भाग कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत अग्निशमन दल आणि प्रशासनाला माहिती दिली.
धोकादायक घोषित केलेली चाळ रिकामी करतानाच दुर्घटना
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चाळ महापालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीसही देण्यात आली होती. त्यानुसार रविवारी दुपारपासून अनेक कुटुंबे आपले सामान आवरत होती. मात्र, रात्रीच्या सुमारास अचानक चाळीचा मोठा भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला असून, शेजारील घरातील एका मुलाचाही ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेकडून बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बृहन्मुंबई महापालिका (BMC) प्रशासन आणि ‘108’ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तीन मजली इमारतीतील दोन ते तीन खोल्यांचा भाग कोसळला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू केले असून, ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.
मृत आणि जखमींची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या दुर्घटनेत आलिया (७), मुस्कान (१४), निहाल(६ ), नाबिया (२), सोनी(३२), मुनाफ ( ७) अशी प्राथमिक माहितीत मृतांची नावे समोर आली आहेत. तर, रेहान अली (२४) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत.
मुसळधार पावसामुळे इमारत कमकुवत झाल्याचा प्राथमिक अंदाज
मुंबई आणि उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सततच्या पावसामुळे धोकादायक चाळीच्या भिंती अधिक कमकुवत झाल्या असाव्यात आणि त्यामुळेच हा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
किशोरी पेडणेकर यांचा प्रशासनावर आरोप
या घटनेनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र दुःख व्यक्त करत महापालिका प्रशासनावर टीका केली. त्यांनी म्हटले की, पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेण्याची मागणी सातत्याने केली होती. योग्य वेळी आवश्यक उपाययोजना झाल्या असत्या, तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप त्यांनी केला.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
सध्या घटनास्थळी ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून बचाव पथके प्रत्येक भागाची तपासणी करत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
मानखुर्द येथील चाळ दुर्घटनेच्या ढिगाऱ्याखाली तब्बल नऊ तास अडकूनही एक शेळी जिवंत असल्याचे आढळून आले. अग्निशमन दल आणि आरडीएमसी (RDMC) च्या बचाव पथकाने रात्रभर सुरू ठेवलेल्या अथक प्रयत्नांनंतर शेळीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. मृत्यू आणि विध्वंसाच्या वातावरणात ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर आलेल्या शेळीमुळे उपस्थित बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सध्या घटनास्थळी ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर व्यक्तींचा शोधही सुरू आहे.

