(खेड / वार्ताहर)
मराठा क्रांती स्वराज्य संघटना या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संघटनेतर्फे देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खेड तालुक्यातील माणी नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका तसेच नावाजलेल्या कवयित्री दिप्ती दिलीप यादव यांना ‘राष्ट्रीय विद्या गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
खेड येथील बिजघर साई मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिप्ती यादव यांनी शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कार्य करत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपणूक केली आहे. तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या कवितांमधून स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना यापूर्वीही सन्मानित करण्यात आले आहे.
आता मिळालेल्या ‘राष्ट्रीय विद्या गौरव पुरस्कारामुळे’ खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

