(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देत तेथील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि तत्पर आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.
डॉ. कंदेवाड यांनी शनिवारी (८ ऑगस्ट) चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर, आयुष्मान आरोग्य मंदिर भिले, ग्रामीण रुग्णालय गुहागर तसेच तालुका आरोग्य अधिकारी, गुहागर यांच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध आरोग्य संस्थांमधील उपलब्ध सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या विविध आरोग्य योजना आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना डॉ. कंदेवाड यांनी दिल्या. आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, तसेच उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुमार कांबळे, डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत तसेच चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह संबंधित आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी संस्थांच्या कामकाजाची आणि उपलब्ध सुविधांची माहिती संचालकांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर यांच्या हस्ते डॉ. विजय कंदेवाड यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वंजारे, रामपूरच्या सरपंच अमिता चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य संस्थांच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना डॉ. कंदेवाड यांनी नागरिकांना वेळेत आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितले. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता राखणे, उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करणे आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच ग्रामीण स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये नागरिकांना आवश्यक सेवा प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने व परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहनही संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी केले.

