(सावंतवाडी / वार्ताहर)
आंबोली धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या हम्पी येथील 38 वर्षीय पर्यटकाचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. धबधब्याच्या परिसरात सापाने चावा घेतल्यानंतर प्रकृती गंभीर झालेल्या पर्यटकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, आंबोली घाटातील वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात पोहोचण्यास मोठा विलंब झाला. उपचाराअभावी वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गंगाधर मरप्पा असे मृत पर्यटकाचे नाव आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हम्पी येथील काही पर्यटक वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोली धबधब्यावर आले होते. मुख्य धबधब्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर गंगाधर मरप्पा हे आंघोळ करत असताना अचानक सापाने त्यांना चावा घेतला. सर्पदंशानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना शुद्ध हरपली आणि तोंडातून फेस येऊ लागला.
घटनेनंतर सोबत असलेल्या पर्यटकांनी आणि स्थानिकांनी त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथे आवश्यक उपचार उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, आंबोली धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रुग्णवाहिकेला धबधब्याच्या परिसरातून खाली येण्यासाठी तब्बल अडीच तास लागल्याची माहिती समोर आली आहे. या विलंबामुळे गंगाधर मरप्पा यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
गंगाधर मरप्पा यांना चावलेला साप मण्यार किंवा नाग जातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, सर्पाची निश्चित जात शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आंबोली धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला तातडीने मार्ग मिळण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्पदंशानंतर वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असताना वाहतूक कोंडीमुळे उपचारास विलंब झाल्याने या घटनेने पर्यटनस्थळांवरील आपत्कालीन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू केला आहे.

