(संगमेश्वर)
वांद्री उक्षी मार्गे रत्नागिरी महामार्गावरील उक्षी–करबुडे घाट रस्त्यात आज दुपारी एका चारचाकीचा भीषण अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले दाम्पत्य सुदैवाने केवळ किरकोळ जखमी झाले आहे.
एमएच ०८ एएक्स १०१५ या क्रमांकाची गाडी घेऊन ज्ञानेश्वर गुरव (५९) आणि त्यांची पत्नी वनिता गुरव (५१) हे उक्षीहून रत्नागिरीकडे जात होते. उक्षी घाटातील चढण चढत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. गाडी कठड्याला धडकून थेट दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदेश जोशी, पोलीस पाटील अनिल जाधव आणि उक्षी गावातील सावंतवाडी, देसाईवाडी, गराटेवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून खाजगी वाहनातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवले.
सुदैवाने दाम्पत्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे काही काळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

