(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी येथील शेतकरी किशोर रामचंद्र पवार यांच्या मालकीच्या असलेल्या गाईवर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार मारल्याने या शेतकऱ्याचे सुमारे २५/३० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी कळझोंडी गावातून होऊ लागली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शनिवार दिनांक १० रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे किशोर पवार हे आपली पाळीव जनावरे चरवण्यासाठी घेऊन जात होते. याच दरम्याने नजीकच दगडाच्या घबीत बिबट्या दडून बसलेला होता. त्याने थेट या पाळीव जनावरांच्या कळपावर हल्ला करून त्यातील एक गाय (पाडी) ठार मारली. या घटनेने जनावरांचे मालक किशोर पवार हे प्रचंड भयभीत होऊन त्यांनी आपला जीव कसाबसा वाचविला. मात्र गाईवर हल्ला करून ठार मारल्याने या शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.काळे, वन
विभाग रत्नागिरी यांना देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी हे जाकादेवी खालगाव येथे बिबट्या विहिरीत पडलेल्या घटनेच्या कामात व्यस्त होते. त्यांनी कळझोंडी येथे घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
कळझोंडी वरवडे परिसरात गेल्या ४/५ वर्षाच्या कालावधीत १८/२० पाळीव जनावरांच्या कळपावर हल्ला करून पाळीव जनावरे फस्त केली आहेत. त्यामध्ये किशोर पवार यांच्या पाच जनावरांचा समावेश आहे. दोन लहान पाडे जंगलात चरण्यासाठी सोडले होते. ते गेले ते परत आलेच नाहीत. अनेक ठिकाणी शोधूनही ते सापडले नाही. तीन पाडे जंगलात चरण्यासाठी घेऊन जात असतानाच घराच्या लगतच असलेल्या शेतीच्या मळ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केले.
या सातत्याने घडणाऱ्या घटनाने किशोर पवार यांना मोठा मनस्ताप व प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दिनांक १० रोजी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या या पाडीची भरीव नुकसान भरपाई त्वरीत मिळाली नाहीतर २६ जानेवारी रोजी वनविभाग कार्यालय रत्नागिरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे जनांदोलन उभारणार असल्याचे किशोर पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.
तसेच खंडाळा येथे पशु वैद्यकीय दवाखाना येथे कायम स्वरुपी पशुसंवर्धन अधिकारी म्हणून स्वतंत्र डॉक्टर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी खंडाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, कष्टकरी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. अन्यथा यासाठी ही आंदोलन उभे केले जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात अनेक पाळीव जनावरे फस्त करण्याची मालिकाच बिबट्याने लावली असून या भागातील अनेक नागरिकांना रस्त्यावरून चालताना, दुचाकी, चारचाकी वाहने चालवताना अनेक बिबट्यांचा मुक्त संचार दिवसा रात्री कायमस्वरुपी दृष्टीस पडतो.
विशेषता दुचाकीवरून अचानक बिबट्या समोर दिसतो, त्यावेळी दुर्दैवाने अचानक अपघात होण्याची शक्यता असते. तरी वनविभागाने तत्परतेने या भागातील परिसरात.सी.सी.टी.व्ही. बसवावा आणि पिंजऱ्यात बंदिस्त करावे, अशी मागणी कळझोंडी व वरवडे गावातील नागरिकांनी केली आहे.

