(चिपळूण / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील सीएनजी पंपासमोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. रविवारी (9 ऑगस्ट) दुपारी सुमारे 3.20 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या कारच्या (एमएच 08 एएक्स 6496) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव कार प्रथम महामार्गावरील डिव्हायडरला धडकली. त्यानंतर नियंत्रण सुटलेली कार बाजूच्या लेनमध्ये शिरली आणि समोरून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वॅगनार कारला (एमएच 43 सीके 8840) जोरदार धडकली.
दोन कारच्या या भीषण धडकेत मयुरेश ढेबे, सायली शिर्के, अभिषेक शिर्के आणि मानसी प्रधान हे चार जण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेल्या जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या 24 तास आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सत्यम पवार यांनी तत्परतेने मदतकार्य करत चारही जखमींना उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सध्या चारही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

