(रत्नागिरी / वार्ताहर)
पावस गावातील बाजारपेठेला भाटीवाडी, फणसवाडी, काझीवाडा आणि तेलीवाडी या चार वाड्यांशी जोडणारा साकव सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. साकवाचे आधारस्तंभ गंजल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पावस गावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी हा साकव अत्यंत महत्त्वाचा आहे. बाजारपेठ, शाळा, आरोग्य सेवा आणि विविध शासकीय कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. परिसरातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठीही हा साकवच प्रमुख मार्ग असल्याने अंत्ययात्रेच्या वेळीही ग्रामस्थांना याच धोकादायक मार्गावरून जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
साकवाच्या मध्यभागी असलेले चार आधारस्तंभ अनेक ठिकाणी गंजले आहेत. त्यामुळे या आधारस्तंभांची मजबुती आणि साकवाची एकूण सुरक्षितता याबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे. पावसाळ्यात खाडीतील पाण्याची पातळी वाढल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होते. पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना साकवावरून ये-जा करणे धोकादायक ठरत आहे.
दररोज शेकडो विद्यार्थी या साकवावरून ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. साकवाची अवस्था लक्षात घेता संबंधित बांधकाम विभागाने तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी किंवा नवीन पुलाचे बांधकाम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच संभाव्य धोका दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे साकवाची तातडीने पाहणी करून त्याच्या सुरक्षिततेबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.
“दुर्घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आजच निर्णय घ्या,” अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. साकवाची तातडीने दुरुस्ती किंवा नवीन पुलाची उभारणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

