(चिपळूण / प्रतिनिधी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील विशेष समिती चिपळूणात दाखल झाली आहे. या समितीने एकूण २८ ग्रामपंचायतींच्या कार्याचे सखोल मूल्यमापन सुरू केले असून विविध विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला जात आहे.
या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसंस्थांना प्रोत्साहन देणे हा आहे. मूल्यांकनातून तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला १५ लाख, द्वितीय क्रमांकाला १२ लाख, तर तृतीय क्रमांकाला ८ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीस ५० लाख रुपयांचे भव्य पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतीक चनावार यांच्या नेतृत्वाखालील या समितीत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जंजाळ, शिक्षण विस्तार अधिकारी धोंडगे तसेच सहायक महाभरे यांचा समावेश आहे. गेले वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत केलेल्या कामांचा आता प्रत्यक्ष पडताळणीद्वारे आढावा घेतला जात आहे.
समितीने आतापर्यंत वालोपे, खांदाटपाली, दळवटणे, पेढांबे, पिंपळी, वेहेळे, धामणवणे, भोम, मालघर, पाथर्डी आणि पाचाड या ग्रामपंचायतींची पाहणी पूर्ण केली आहे. या ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या गुणांकनाची प्रत्यक्ष कामांशी तुलना करून सविस्तर तपासणी केली जात आहे. तालुक्यातील पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड समितीकडून अंतिम करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मिलिंद केळसकर व भास्कर कांबळे यांचेही सहकार्य लाभत आहे.
दरम्यान, राज्य शासनाने या अभियानासाठी प्रत्येक तालुक्याला २ लाख १० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून तो जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमध्ये वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.

