(खेड रत्नागिरी /प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या आनंदासाठी चिपळूणच्या दिशेने निघालेल्या तरुण-तरुणीच्या प्रवासावर रविवारी सकाळी काळाने घाला घातला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक दुचाकीचा भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने दुचाकी महामार्गालगतच्या तब्बल २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत दुचाकीस्वार सतीश निवृत्ती पाटे (वय २९, रा. पोलादपूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत प्रवास करणारी अक्षता अरविंद कवडे (रा. चिपळूण) गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटे आणि अक्षता कवडे हे दुचाकीवरून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने येत होते. रविवारी सकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास खवटी गावानजीक दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आत दुचाकी महामार्गालगतच्या खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की सतीश पाटे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागील बाजूस बसलेली अक्षता गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमी अक्षताला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या उत्साहात आपल्या माणसांना भेटण्यासाठी चिपळूणच्या दिशेने निघालेला प्रवास सतीशसाठी अखेरचा ठरला. सणाच्या आनंदासाठी सुरू झालेल्या या प्रवासाची काही क्षणांतच शोकांतिकेत झालेली परिणती मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेने पाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत महामार्गावरील धोकादायक ठिकाणी वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा या दुर्घटनेने अधोरेखित केली आहे.


