(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात पडून दोन चिमुकल्या चुलत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (9 ऑगस्ट) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. आयुष रवींद्र मिसाळ (वय 3) आणि तन्वी अविनाश मिसाळ (वय 2) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
या घटनेने अमळनेर परिसरावर शोककळा पसरली असून, दोन चिमुकल्यांच्या अचानक जाण्याने मिसाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष हा रवींद्र मिसाळ यांचा एकुलता एक मुलगा, तर तन्वी ही अविनाश मिसाळ यांची एकुलती एक मुलगी होती.
कुटुंबीयांची नजर चुकवून नदीच्या पाण्याजवळ गेली
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष आणि तन्वी घराजवळ खेळत होते. खेळता खेळता दोन्ही मुले कुटुंबीयांची नजर चुकवून घराशेजारी असलेल्या गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाकडे गेली. काही वेळानंतर दोन्ही मुले दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध सुरू केला. शोध घेत असताना दोन्ही मुले गोदावरी नदीच्या पाण्यात तरंगताना नागरिकांना आढळून आली. नागरिकांनी तातडीने ही माहिती कुटुंबीयांना दिली.
नागरिकांच्या मदतीने चिमुकल्यांना पाण्याबाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोन्ही चिमुकल्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक वैभव इस्टके आणि सागर वाघमारे यांच्या मदतीने दोन्ही मुलांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले. ही माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या प्रसंगामुळे उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले.
आयुष आणि तन्वी यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी 5 वाजता अमळनेर वस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

