(ठाणे / वृत्तसंस्था)
महाराष्ट्रात व्यवसाय आणि रोजगार करायचा असेल, तर व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 15 ऑगस्टनंतरही व्यवहारिक मराठीचे ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. त्यामुळे अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी प्रशिक्षण अभियानाला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र दिन, 1 मेपासून राज्यभर सुरू असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियाना’चा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
या समारोप कार्यक्रमात व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी प्रवासी वाहनचालकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी, 9 ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
100 दिवसांच्या विशेष अभियानाला मोठा प्रतिसाद
राज्यभर राबविण्यात आलेल्या या 100 दिवसांच्या विशेष मराठी प्रशिक्षण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
‘महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडली पाहिजे’
महाराष्ट्रात व्यवसाय आणि रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडली पाहिजे. मराठी ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी मराठीत दोन प्रेमाचे शब्द बोलणारा रिक्षा किंवा टॅक्सी चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
प्रमाणपत्र असूनही मराठी येत नसेल तर कारवाई
केवळ मराठी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घेतल्याने कारवाई टळणार नाही, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील. संबंधित चालकाला मराठीत उत्तर देता येणे आवश्यक असेल. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
मराठीत संवाद साधण्याचे प्रवाशांनाही आवाहन
मराठी भाषेचा वापर वाढविण्याची जबाबदारी केवळ रिक्षा आणि टॅक्सी चालकांची नसून मराठी नागरिकांचीही आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. प्रवाशांनी समोरचा चालक अमराठी आहे असे गृहीत धरून थेट हिंदीत संवाद साधण्याऐवजी मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या मराठी भाषा विभागासह मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने हे 100 दिवसांचे मराठी प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले.

