(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
चिपळूणनजीकच्या खेर्डी एमआयडीसी परिसरातील फर्निचर निर्मिती करणाऱ्या एका कारखान्याला बुधवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने कारखान्यातील मोठ्या भागाला आगीने वेढले. या दुर्घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
आगीची माहिती मिळताच चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कारखान्यात मोठ्या प्रमाणावर फर्निचर व ज्वलनशील साहित्य असल्याने आग भडकण्याची शक्यता अधिक असल्याने बचावकार्यादरम्यान विशेष खबरदारी घेण्यात आली. दरम्यान, खेर्डी एमआयडीसी परिसरात फायर स्टेशन उभारण्यात आले असले, तरी येथे स्वतंत्र अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याकडे स्थानिकांकडून लक्ष वेधण्यात आले. औद्योगिक वसाहतीत वारंवार आगीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन यंत्रणेच्या उपलब्धतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोकप्रतिनिधी, नागरिक घटनास्थळी
आगीची माहिती मिळताच ठाकरे सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम, चिपळूण नगरपालिकेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रवादीचे नेते नितीन ठसाळे यांनी मुंबईहून उपलब्ध मार्गाने मदतकार्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला. आगीचे वृत्त समजताच रात्री उशिरा परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, तसेच कारखान्यातील साहित्य आणि मालमत्तेचे किती नुकसान झाले, याबाबतची अधिकृत माहिती पंचनामा केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


