( मुंबई )
महाराष्ट्र सरकारने राज्यातील पोलीस दलातील 24 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचीही बदली करण्यात आली आहे. दत्ता कराळे यांची आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या या बदलीमागे कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील आरोप कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय आणि पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे.
अशोक खरातच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून वाद
नाशिकचे आयजी असताना दत्ता कराळे यांनी अशोक खरातच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. “भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यक्रमात IG दत्ता कराळे का गेले?” असा सवाल अंजली दमानिया यांनी सार्वजनिकपणे केला होता. इतकंच नव्हे तर दत्ता कराळे यांनी त्या कार्यक्रमात भाषणही केल्याचं समोर आलं होतं.
‘18 वेळा फोनवर संवाद’ असल्याचा दावा
अंजली दमानिया यांनी दत्ता कराळे आणि अशोक खरात यांच्यात तब्बल 18 वेळा फोनवर संवाद झाल्याचा दावाही केला होता. या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. विरोधकांकडूनही या प्रकरणात चौकशीची मागणी करण्यात आली होती. दमानिया यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते. तसेच दत्ता कराळे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
राज्यातील मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल
राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये विविध परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आगामी कायदा-सुव्यवस्था, प्रशासकीय कामकाज आणि संवेदनशील प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा फेरबदल मानला जात आहे. दत्ता कराळे यांच्या बदलीनंतर नाशिक परिक्षेत्रात नवीन पोलीस महानिरीक्षक कोण असणार याकडेही लक्ष लागले आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राज्यात खळबळ
कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात विविध आरोप समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी चर्चा रंगली होती. त्याच्या कार्यक्रमांना राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील काही व्यक्ती उपस्थित राहत असल्याचे आरोप झाल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर आता दत्ता कराळे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली असून, सरकारच्या या निर्णयामागे अशोक खरात प्रकरणातील वाद कारणीभूत ठरल्याची चर्चा पोलीस आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी
| अ.क्र. | अधिकारी | सध्याचे पद (Current Post) | बदली / नवीन पदस्थापना (Transferred / New Post) |
|---|---|---|---|
| 1 | कृष्ण प्रकाश | अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन | अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) |
| 2 | दत्ता कराळे | विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र | विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग |
| 3 | प्रविण पडवळ | विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण | विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र |
| 4 | लखमी गौतम | पोलीस सह आयुक्त (गुन्हे), बृहन्मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य |
| 5 | मनोज शर्मा | विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य | पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), बृहन्मुंबई |
| 6 | सुनील हक | विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) | पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई |
| 7 | महेश पाटील | अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) |
| 8 | परमजीत दहिया | अपर पोलीस आयुक्त, मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक |
| 9 | सी. के. मीना | विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र |
| 10 | संजय दराडे | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण parिक्षेत्र | पोलीस सह आयुक्त, पुणे |
| 11 | रंजन शर्मा | पोलीस सह आयुक्त, पुणे | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र |
| 12 | सुनील फुलारी | विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र | विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) |
| 13 | राजेश प्रधान | पदस्थापनेच्या प्रतीक्षेत | पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई |
| 14 | विविश मिश्रा | पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण |
| 15 | जय कुमार | पोलीस सह आयुक्त (प्रशासन), मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन |
| 16 | संजय येडपुरे | पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई | विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा |
| 17 | संजय जाधव | अपर पोलीस आयुक्त, ठाणे | अपर पोलीस आयुक्त, ठाणे (In Situ Promotion) |
| 18 | दीपक साकोरे | अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई | पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई |
| 19 | पंजाबराव उगले | अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे | विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ |
| 20 | एस. व्ही. पाठक | अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), ठाणे | विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), पुणे |
| 21 | विनायक देशमुख | अपर पोलीस आयुक्त, ठाणे | नियंत्रक, वैधमापन |
| 22 | ज्योती प्रिया सिंह | पदस्थापनेच्या प्रतीक्षेत | विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक |
| 23 | अनिल कुंभारे | पोलीस सह आयुक्त, वाहतूक, मुंबई | पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई |
| 24 | सत्य नारायण चौधरी | पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई | पोलीस सह आयुक्त, वाहतूक, मुंबई |

