(रत्नागिरी / राजापूर)
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मानसपुत्र आणि स्वामी संप्रदायातील थोर संत श्री स्वामीसुत महाराज (हरिभाऊ दाजीबा तावडे) यांच्या पवित्र पादुकांचे आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे भवनात सवाद्य स्वागत करून विधिवत पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे, सुमारे १६० वर्षांनंतर प्रथमच स्वामीसुत महाराजांच्या पादुका तावडे भवनात आणण्यात आल्या, त्यामुळे तावडे कुटुंबीय आणि भाविकांसाठी हा सोहळा श्रद्धा व भक्तिभावाने भारलेला ठरला.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाछायेत अध्यात्माचा प्रसार करणाऱ्या श्री स्वामीसुत महाराजांचे जीवन गुरुभक्ती, सेवा, त्याग आणि अध्यात्माचा संदेश देणारे आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील १६ ते १८ या तीन अध्यायांमध्ये श्री स्वामीसुत महाराजांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या कामाला धार्मिक अधिष्ठान
तावडे भवन येथे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर उभारण्यात येत आहे. या मंदिराच्या उभारणीच्या अनुषंगाने श्री स्वामीसुत महाराजांच्या पादुकांचे पूजन करून मंदिराच्या आढे चढविण्याचा धार्मिक विधी करण्यात आला.
या विधीसाठी आर्किटेक्ट संतोष तावडे आणि सौ. सिद्धी तावडे यांनी यजमानपदाची जबाबदारी पार पाडली. पादुकांचे आगमन आणि मंदिराच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचा धार्मिक विधी एकाच वेळी झाल्याने हा दिवस तावडे कुलोत्पन्नांसाठी विशेष आणि अविस्मरणीय ठरला.
यावेळी तावडे हितवर्धक मंडळाचे पदाधिकारी दिनकर तावडे, सतीश तावडे, सुहास तावडे, अतुल तावडे, प. पू. मौनी महाराज (नागपूर), श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मुंबईपुरी गादीचे मठाधिपती विजय नलावडे तसेच श्री स्वामीसुत महाराजांचे वंशज आणि तावडे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रमानंतर तावडे हितवर्धक मंडळातर्फे प. पू. मौनी महाराज आणि मठाधिपती विजय नलावडे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर मंदिराचा कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तावडे हितवर्धक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
‘तावडे भवनाची कीर्ती जगभर पसरू दे’
यावेळी मठाधिपती विजय नलावडे म्हणाले, “स्वामीसुत महाराजांची मुंबापुरीत गादी स्थापन करण्याचे भाग्य स्वामी महाराजांनी दिले. आज महाराजांच्या पादुका तावडे भवनात आल्या आणि त्यांचे विधिवत पूजन झाले, ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. यानिमित्ताने आडिवरे येथील श्री महाकाली मातेच्या मंदिरालाही भेट देण्यात आली. तावडे भवन आणि तावडे हितवर्धक मंडळाची कीर्ती जगभर पसरावी,” अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
‘तावडे कुलबांधवांसाठी भाग्याचा दिवस’
आर्किटेक्ट संतोष तावडे म्हणाले, “आजचा दिवस तावडे कुलबांधवांसाठी अत्यंत भाग्याचा आहे. २०१८ मध्ये तावडे वाड्याचा लोकार्पण सोहळा झाला होता. आता श्री स्वामीसुत महाराजांच्या पवित्र पादुका आढे चढविण्याच्या धार्मिक विधीसाठी तावडे भवनात आल्या, ही आमच्यासाठी मोठी आध्यात्मिक अनुभूती आहे. या पादुकांच्या आगमनामुळे तावडे भवनाला धार्मिकदृष्ट्या दैवी अधिष्ठान लाभले आहे.”
पादुकांच्या आगमनाने तावडे भवन परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी पादुकांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या आगामी कलशारोहण सोहळ्याचीही भाविक आणि तावडे कुलबांधवांना उत्सुकता लागली आहे.

