[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या किटमधील गोळ्या देण्याच्या बदल्यात गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची कथित लाच स्वीकारल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (४८, रा. पागमळा, चिपळूण) यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वर्ग-२ (अ) गटातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर निर्णय होताच निलंबनाचा आदेश काढण्यात आला.
या कारवाईमुळे एसीबीच्या धडक कारवाईनंतर रखडलेली प्रशासकीय प्रक्रिया अखेर पुढे सरकली आहे. मात्र, लाचप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निलंबनामुळे आरोग्य विभागातील कार्यपद्धती आणि रुग्णालयातील औषधवाटप व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३ जून रोजी सायंकाळी कथित लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या गोळ्या देण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि कारवाई केली.
तक्रारदार महिलेकडून लाचेची रक्कम डॉ. मदार यांनी त्यांच्या खासगी चारचाकी वाहनात स्वीकारल्याचा आरोप आहे. वाहन क्रमांक एमएच ०८ एएक्स २६१८ असल्याची माहिती तपासात समोर आली होती. लाचेची रक्कम स्वीकारताच पंचांसमक्ष दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने कारवाई करत डॉ. मदार यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीच्या या कारवाईने जिल्ह्याच्या आरोग्य विभागासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले होते. विशेष म्हणजे, रुग्णालयाशी संबंधित औषधसाठा, त्याचे वितरण आणि गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची उपलब्धता याबाबतही या प्रकरणामुळे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे केवळ निलंबनापुरती कारवाई मर्यादित न ठेवता, रुग्णालयातील संबंधित औषधवाटप व्यवस्था, जबाबदारीची साखळी आणि या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
एसीबीच्या कारवाईनंतर डॉ. मदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आला होता. अखेर त्यावर निर्णय झाल्याने प्रशासनाने कारवाईचे एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, या प्रकरणातील पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही काय असेल, याकडेही लक्ष राहणार आहे. तसेच लाच स्वीकारल्याच्या आरोपानंतर निलंबन झाले असले तरी आता पुढील चौकशी किती खोलवर जाते, यावर या कारवाईची खरी परिणामकारकता ठरणार आहे.

