(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आरजू कंपनीच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात गेली तीन वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मुचरी येथील गुंतवणूकदार विलास वामन सुर्वे यांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे. आपल्या मागण्यांवर प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या इशाऱ्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा या फसवणूक प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात सुर्वे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरजू कंपनीच्या फसवणूक प्रकरणी न्यायालयात गेली तीन वर्षे खटला सुरू असला, तरी अद्याप फसवणूकग्रस्तांच्या हाती कोणताही ठोस दिलासा मिळालेला नाही. न्याय मिळावा यासाठी उपोषणासह विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली; मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच पुनरावृत्ती झाली असून, संबंधितांवर प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फसवणूक करणाऱ्या आरोपींची मालमत्ता तातडीने जप्त करून तिचा लिलाव करण्यात यावा आणि त्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या निधीतून सर्व गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. तसेच, फसवणूकग्रस्तांचे संपूर्ण पैसे परत मिळेपर्यंत या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ नये, अशीही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या मागण्यांवर पुढील पंधरा दिवसांत ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कारवाई झाली नाही, तर १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असा स्पष्ट इशारा सुर्वे यांनी दिला आहे. या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, एका फसवणूकग्रस्त गुंतवणूकदाराने न्यायाच्या प्रतीक्षेत आत्मदहनाचा इशारा दिल्याने आरजू कंपनीच्या फसवणूक प्रकरणाकडे पुन्हा एकदा जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. प्रशासन या गंभीर इशाऱ्याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि फसवणूकग्रस्तांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्व संबंधितांचे लक्ष लागले आहे.

