(रत्नागिरी)
शहरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोकणनगर चौकीच्या पथकासह संयुक्त कारवाई करत मोठा आळा घातला. या कारवाईत तब्बल ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून शहर परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त होत होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, गुरुवारी (दि. ३० एप्रिल) पहाटेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या पथकाने शहरातील शिळ-मिरजोळे परिसरात गस्त घालत असताना स्वरूपानंद सुभाष कदम (वय ३०, रा. शिळ कदमवाडी, रत्नागिरी) हा संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. चौकशीदरम्यान तो गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करताना गुळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन तसेच तयार गावठी दारू असा एकूण ८९,०५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर मुद्देमाल तात्काळ नष्ट करण्यात आला असून संबंधिताविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच दिपक साळवी, राजेंद्र सावंत, अमिता पाटील, उमेश पवार, भालचंद्र मयेकर, अमित पालवे आणि निलेश शिंगवे आदींनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

