(रत्नागिरी)
रत्नागिरी नगर परिषद यांनी आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम अधिक तीव्र केली असून, थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मालमत्ताधारकांवर मालमत्ता सील करणे तसेच पाणीपुरवठा खंडित करण्यासारखी पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मार्च महिना निम्म्यावर आला असतानाच शहरातील महसूल संकलनाचा आढावा घेतल्यावर घरपट्टी वसुली अजूनही अपेक्षित पातळीपासून दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात सुमारे ३१ हजार मालमत्ताधारक असून, चालू आर्थिक वर्षात १५ कोटी ८७ लाख रुपयांच्या घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ कोटी ४७ लाख ४९ हजार ५३४ रुपये, म्हणजेच ६२.२० टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे उर्वरित ६ कोटी ४० लाखांहून अधिक रक्कम अल्पावधीत जमा करण्याचे मोठे आव्हान नगरपरिषदेसमोर उभे आहे. पाणीपट्टी वसुलीची स्थिती तुलनेने समाधानकारक असली तरी अजूनही थकबाकीची रक्कम लक्षणीय आहे. शहरातील सुमारे ११ हजार नळजोडण्यांमधून ३ कोटी २१ लाख ७९ हजार ८४ रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी ५६ लाख ८० हजार ५०९ रुपये वसूल झाले असून, ही वसुली ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. उर्वरित २० टक्के थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने पथके अधिक सक्रिय केली आहेत.
नगरपरिषदेने नागरिकांना थकबाकी वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असले, तरी वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्यांवर आता थेट कारवाईची तयारी सुरू झाली आहे. मालमत्ता सील करणे, थकीतदारांचे नळजोड तात्पुरते खंडित करणे अशा उपाययोजनांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे १३ दिवस शिल्लक असल्याने वसुली पथके शहरातील विविध भागांत फिरून थकबाकीदारांशी संपर्क साधत आहेत. महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने शेवटच्या टप्प्यात आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

