(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी भारत स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हा कार्यालय आणि शिक्षण विभाग, माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सावर्डे, खेड आणि रत्नागिरी येथे स्काऊटर-गाईडर उजळणी व युनिट नोंदणी वर्ग उत्साहात पार पडले.
या वर्गांमध्ये स्काऊट्स-गाईड्सच्या युनिट नोंदणी प्रक्रियेसह अभ्यासक्रम, विविध उपक्रम तसेच राज्य पुरस्कारासाठी आवश्यक बाबी याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्काऊट-गाईड चळवळीतील विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन यावेळी देण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गांसाठी जिल्हा संघटक रमाकांत डिंगणे, जिल्हा ट्रेनर तथा पदाधिकारी दिनेश नाचणकर, संजय पाथरे, राजश्री पाटील, किशोर धुत्रे, संतोष तांबे, दीपक मांडवकर आणि प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाला शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त दीपक मेंगाणे आणि उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा चिटणीस संदेश कडव यांनी शुभेच्छा दिल्या.
वर्गांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कार्यालयातील कर्मचारी सोमनाथ गायकवाड आणि नितीन पाडावे यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्ह्यातील स्काऊटर-गाईडरना अद्ययावत माहिती मिळण्याबरोबरच युनिट नोंदणी आणि विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या उजळणी वर्गांचा मोठा उपयोग झाला.

