(गुहागर)
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी.बी.मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार सन २०२३ वितरण सोहळा बुधवार दि. ९.१०.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे पार पडला. टी.बी. मुक्त ग्रामपंचायत सर्वेक्षणात महाराष्ट्रातील २२५० ग्रामपंचायत पात्र झाल्या होत्या. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीं पैकी ४२ ग्रामपंचायती टी.बी. मुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरल्या. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ आणि ग्रामपंचायत पाभरे-कुटगीरी या दोन ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रथमच सुरू करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप होते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. उमराठ ग्रामपंचायतीच्यावतीने उपसरपंच सुरज घाडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग यांनी हा पुरस्कार स्विकारला.
उमराठ गावातील लहान-थोर ग्रामस्थांच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी सतत परिश्रम घेणाऱ्या सहकाऱ्यांचे/ कर्मचार्यांचे यामागे मोठे योगदान आहे. सदर पुरस्कार मिळण्यामागे हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या उमराठ आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, आरोग्य सेवक अजय हळये, आशा सेविका रूचिता कदम, वर्षा गावणंग, अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, वर्षा पवार, सारिका धनावडे, मदतनीस निलम जोशी, समृद्धी गोरिवले, शाळेतील शिक्षकवर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ यांचे वेळोवेळी उत्तम सहकार्य लाभले, असे ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले.
सदर सोहळ्यास जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरीचे डॉ.जोत्स्ना वाघमारे इत्यादी प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती.