(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत उपकेंद्र धामणसेमार्फत धामणसे व चाफे गावात ‘TB मुक्त भारत’ अभियानांतर्गत विशेष क्षयरोग शोध मोहीम आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळत आहे.
या मोहिमेदरम्यान राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘हिवताप प्रतिरोध महिना जून २०२६’ जनजागृती अभियानही राबविण्यात आले. नागरिकांना हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, माकडताप, अतिसार आणि हगवण यांसारख्या आजारांबाबत माहिती देण्यात आली. परिसर स्वच्छतेचे महत्त्व तसेच २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
याचबरोबर ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ आणि ‘कुष्ठरोग जनजागृती अभियान’ अंतर्गत १५ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत गृहभेटी देऊन नागरिकांना विविध आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. तसेच NCD अंतर्गत आरोग्य तपासणी करून जनजागृती करण्यात आली.
या सर्व मोहिमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रत्नागिरी तालुक्यातील श्री. पावसकर व बंदेवाड यांनी विशेष सहकार्य केले. प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांनीही परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात तब्बल १३३ नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात आली. या मोहिमेमुळे क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून उर्वरित गावांमध्येही लवकरच अशाच तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

