( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरीतील ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या थिबा राजा कालीन बुद्धविहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर उभारण्याचा घातलेला घाट रद्द करावे, शासनाने साडेसतरा गुंठे जमिनीवरील उठवलेले आरक्षण पूर्ववत करून तत्काळ जमीन समाजाच्या ताब्यात द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी आंबेडकरी बौद्ध समाजाकडून विराट मोर्चा काढण्यात आला.
थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘थिबा राजाकालीन बुद्धविहाराची साडेसतरा गुंठे जागा पुन्हा आरक्षित झालीच पाहिजे… नको आम्हाला शासनाचे साडेसात कोटी, स्वाभिमानी बाणा आहे आमच्या पाठी… ताब्यात द्या ताब्यात द्या बुद्धविहाराची जागा… जोवर कम्युनिटी सेंटर रद्द होत नाही, तोवर समाजाचा लढा संपत नाही…’ अशा घोषणांनी संपूर्ण रत्नागिरी शहर दुमदुमून गेले. मोर्चाची सुरुवात सकाळी साडेअकराच्या सुमारास थिबा कालीन बुद्धविहार परिसरातून त्रिसरण आणि पंचशील ग्रहणाने झाली. या वेळी भंत्ते सुमेधबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खू संघाच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले.
या मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, उपाध्यक्ष प्रकाश पवार, दीपक जाधव, राजेंद्र आयरे तसेच बौद्ध समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी केले. तालुक्वियातील विविध भागांमधून आलेल्या महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा विराट धडक मोर्चा थिबा कालीन बुद्धविहार येथून जेलरोडमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर घोषणांच्या गजरात मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाले.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, कार्याध्यक्ष अनंत व्ही. सावंत, सचिव अमोल जाधव, उपाध्यक्ष अनिल जाधव, प्रकाश पवार, किशोर पवार, तसेच सल्लागार सुनील आंबुलकर, संजय आयरे, राजेंद्र कांबळे, अजित जाधव, बी. के. कांबळे, राहुल पवार, प्रदीप पवार, शिवराम कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गाव मौजे झाडगाव (ता. रत्नागिरी) येथील भूमापन क्र. २४८/१/२, क्षेत्र १७.५० गुंठे ही जागा शासन आदेशानुसार थिबा राजा कालीन बुद्धविहारासाठी राखीव ठेवण्यात आली होती. परंतु, नगरपरिषदेने या आरक्षित धार्मिक स्थळावर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नरोत्त्थान महाअभियानांतर्गत कम्युनिटी सेंटर बांधण्याची परवानगी मागितली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ती मान्य केली. हे शासन निर्णयाला विरोधात असून धार्मिक स्थळाचा अवमान करणारे असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.
सदर जागेवर बुद्धविहार आधीच अस्तित्वात असून, गेली अनेक दशके तेथे बौद्ध समाजाचे धार्मिक कार्यक्रम, पौर्णिमा उत्सव आणि धम्म उपक्रम पार पडत आले आहेत. या जागेचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊनच शासनाने २०१४ मध्ये व नंतर २८ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशानुसार ती जागा बुद्धविहारासाठी आरक्षित केली होती. मात्र, १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या आदेशानुसार ही नोंद ‘नजरचुकीने झाली’ म्हणून कमी करण्यात आली, हे प्रशासनाचे चुकीचे पाऊल असल्याचे निवेदनात नमूद आहे. समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे कम्युनिटी सेंटरसाठी सुरू केलेली कार्यवाही तात्काळ रद्द करून, थिबा राजा कालीन बुद्धविहाराची आरक्षित नोंद पूर्ववत करण्यात यावी, अशी महत्वाची मागणी केली आहे.
“धम्म, संस्कृती आणि स्वाभिमानासाठी रस्ता धरला आहे” या भूमिकेतून बौद्ध समाज एकदिलाने रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून येत होते. प्रशासनाने शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पार पडावा यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवून खबरदारी घेतली होती. मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील देखील सभास्थळी दाखल झाले होते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
थिबा राजा कालीन बुद्धविहार हे शंभराहून अधिक वर्षे जुने असून, येथेच म्यानमारचे राजा थिबा यांच्या काळात प्रार्थनास्थळ उभारण्यात आले होते. या स्थळाला ‘अ’ वर्गीकृत धार्मिक स्थळाचा दर्जा आहे. २०१६ मध्ये म्यानमारचे परराष्ट्रमंत्री आणि थिबा राजाचे वंशज या विहाराला भेट देऊन पूजा-अर्चना करून गेले होते. त्यामुळे या स्थळाचे ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा कार्यकर्त्यांचा पुढाकार
मोर्चा यशस्वी होण्यासाठी युवक आणि महिला वर्गाने अत्यंत सक्रिय सहभाग नोंदविला. मोर्चाच्या नियोजनापासून ते व्यवस्थापनापर्यंत सर्व जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडण्यात आल्या. यामध्ये रत्नदीप कांबळे, रुपेश कांबळे, देवेन कांबळे, केतन पवार, राजेंद्र कांबळे, अजित जाधव, सागर जाधव, सुनील पवार, राहुल पवार, सौरभ आयरे, संदेश पवार, सुवेज चव्हाण सर, मनोज कांबळे, अनंत पवार, भरत पवार, कुलदीप पवार, मुकुंद सावंत, बेटकर मॅडम, सुवांग पवार आदी असंख्य युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. मोर्चाची रचना, प्रचार, समन्वय, घोषणाबाजी, आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन या सर्व स्तरांवर युवक वर्ग खांद्याला खांदा लावून उभा राहिला. महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेत, स्वयंसेवक म्हणून संघटनेचे कार्य सक्षमपणे पार पाडले. त्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला संघटित व प्रभावी रूप प्राप्त झाले.
समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध योगदान
मोर्चाच्या वेळी शिस्त राखण्यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. शहरातील मुख्य मार्गांवर मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये आणि मोर्चात कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या दलाचे स्वयंसेवक सक्रीय होते. पोलिस यंत्रणेबरोबरीने समता सैनिक दलाचे सैनिक रस्त्यांवर तैनात राहून मार्गदर्शन, शिस्त आणि सुरक्षा राखण्याचे कार्य पार पाडत होते. मोर्चात इतर कोणीही बाहेरील व्यक्ती घुसखोरी करू नये, तसेच शांततापूर्ण वातावरणात आंदोलन पार पाडावे यासाठी त्यांनी सतत दक्षता घेतली.

