(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचे मनापासून कौतुक केले. पदामुळे नव्हे तर कर्तृत्वामुळे व्यक्ती मोठी ठरते, हे अजित पवार यांनी सातत्याने दाखवून दिले. ते कधीही खचले नाहीत; पक्ष आणि कार्यकर्त्यांबद्दल त्यांना नेहमीच तळमळ होती. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला वैभवाचे दिवस पाहायला मिळाले, असे पटेल म्हणाले.
यावेळी पटेल यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर टीकाही केली. काही लोक पक्ष कसा चालवायचा याचे सल्ले देत आहेत. ज्यांचा पक्षाशी थेट संबंध नाही, ते उपदेश करत फिरत आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत विसंगती दिसते, अशा शब्दांत पटेल यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू होती. आजच्या निर्णयाने त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

