(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील ताम्हाणे येथील सर्पदंशग्रस्त महिलेच्या मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, ग्रामीण रुग्णालय प्रशासनाविरोधातील जनक्षोभ तीव्र होत आहे. उपचारात झालेल्या कथित विलंबामुळे आणि डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याच्या आरोपांनंतर प्रशासनाने प्राथमिक पाऊल उचलत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी साळुंखे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
सोमवारी सर्पदंश झालेल्या महिलेला गंभीर अवस्थेत देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत अपेक्षित तत्परता दिसून न आल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून करण्यात आला. “गोल्डन पिरेड” मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या काळात उपचार सुरू होण्यात विलंब झाल्याने महिलेचा जीव गेल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणाची दखल घेत स्थानिक राजकीय पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी थेट ग्रामीण रुग्णालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा ढासळलेला कारभार आणि डॉक्टरांच्या अनुपस्थितीच्या तक्रारी यावेळी पुन्हा ऐरणीवर आल्या.
दरम्यान, वाढता लोकक्षोभ, निवेदने आणि जनतेच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत प्रशासनाने मंगळवारी प्राथमिक कारवाई करत डॉ. शिवाजी साळुंखे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. संबंधित घटनेची सखोल चौकशी सुरू असून, चौकशी अहवालानंतर पुढील प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

