( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरत्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून कारभार सुरू होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह विविध विकासकामांनाही अडथळे निर्माण होत असल्याची बाब कोंडगाव विभागातील कार्यकर्त्यांनी आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
आमदार भैय्या सामंत हे साखरपा दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांनी कोंडगाव ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार सामंत यांनी संगमेश्वर गटविकास अधिकाऱ्यांना कोंडगाव ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.
या निर्देशानुसार संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये तसेच संबंधित विकास अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यानुसार कोंडगाव ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामसेवक नियुक्तीचे पत्र विस्तार अधिकारी शंकर घुले यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले.
पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध झाल्याने ग्रामपंचायतीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्यासह विविध विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, जिल्हा नियोजन समिती सदस्य बापूशेठ शेट्ये, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर, कोंडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रद्धा शेटे यांच्यासह सदस्य गांधी, चव्हाण, केतकर, नयना, लक्ष्मण कदम, मंगेश जोयशी, जितेंद्र जोयशी आणि संजय गांधी यांनी आमदार भैय्या सामंत यांचे आभार मानले.
आमदार सामंत यांच्या ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या भूमिकेचा अनुभव कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रश्नाच्या तत्काळ निराकरणातून आल्याची भावना व्यक्त करत, पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानले.

