(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जैतापूर खाडीवरील पूल हा परिसरातील नागरिकांसाठी जीवनरेषा मानला जातो. शेकडो गावांचा संपर्क या पुलावर अवलंबून आहे. शालेय विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नागरिक, बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, दवाखान्यात जाणारे रुग्ण अशा प्रत्येकासाठी हा पूल अत्यावश्यक आहे. मात्र आज या पुलावरून चालणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे.
पूलावरील रस्त्याची अवस्था इतकी भयावह झाली आहे की, ठिकठिकाणी पडलेले खड्डे हा रस्ता एखाद्या भौगोलिक अभ्यासाच्या नकाशासारखा भासवतो. एकीकडे आफ्रिकेसारखा खोल खड्डा, दुसरीकडे सपाट ऑस्ट्रेलिया, मधोमध अमेरिकन कॅनियनसारखी भयंकर दरी, आणि शेवटी पाण्याने भरलेला भारताच्या आकाराचा खड्डा — हा विनोद नाही, तर व्यथित करणारी वास्तव स्थिती आहे.
ही अवस्था म्हणजे केवळ वाहतुकीसाठी अडथळा नाही, तर ती आपल्या व्यवस्थेतील अपयश, नागरिकांची उदासीनता आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचं जिवंत उदाहरण आहे. खड्डे पडले म्हणजे दोष प्रशासनाचा, असा सरळ निष्कर्ष काढणे सोपे आहे. पण आपण नागरिक म्हणून स्वतःकडे बोट दाखवतो का? यासाठी आपण आपलेच आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
या पुलाच्या दुर्दशेबाबत किती वेळा निवेदन दिले गेले? ग्रामसभा किंवा सामाजिक चळवळीत हा मुद्दा किती वेळा मांडण्यात आला? स्थानिक नेतृत्व, सरपंच, सामजिक कार्यकर्ते यांची भूमिकाही तपासण्याची गरज आहे. सामाजिक माध्यमांवर फोटो टाकणे, व्हिडीओ बनवणे यापेक्षा प्रत्यक्ष कृती कुठे दिसते?
राजकारणासाठी रस्त्यावर उतरलेले स्थानिक पुढारी, आंदोलने करणारे संघटनांचे कार्यकर्ते या मुद्द्यावर मात्र गप्प का? ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन सार्वजनिक दबाव निर्माण केला का? की हे सर्व काही सोशल मीडियापुरतंच मर्यादित राहिलं? आज सोशल मीडियावर दिल्ली, मुंबई, कोलकाता यांच्या बातम्यांवर चर्चा करणारे आपल्याच गावातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. ही सामाजिक विसंगती आणि जबाबदारीपासून दूर जाण्याची वृत्ती आपल्यालाच अपयशाच्या खड्ड्यात नेऊन सोडते.
जैतापूर खाडी पूल ही एक साधी सुविधा नव्हे तर तो आपल्याला अंतर्मुख करणारा आरसा आहे. त्यात फक्त पाणी भरलेलं नाही, तर त्यामध्ये आपल्या निष्क्रियतेचं प्रतिबिंब साठलेलं आहे. सरकार येईल, कामं होतील, खड्डे बुजवले जातीलही कदाचित. पण त्याआधी आवाज उठवण्याचं काम कोण करणार? आपण केव्हा तरी पुढे येणार का? कारण शेवटी, रस्त्यावर पडलेला खड्डा फक्त एक तांत्रिक समस्याच नाही, ती एक आपल्या जागरूकतेचा कस पाहणारी सामाजिक चाचणी आहे. आता खऱ्या अर्थाने जनतेतून आवाज येणे आणि वेळप्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचे आहे.

