(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शिक्षण विभागाची धुरा हाती घेताच नूतन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पहिल्याच दिवशी प्रशासनाला शिस्तीचा धडा देण्यास सुरुवात केली. कामात दिरंगाई करणारे कर्मचारी-अधिकारी, प्रलंबित प्रकरणे आणि बैठकींना दांडी मारणाऱ्यांना कोणतीही सबब चालणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यामुळे शिक्षण विभागात पदभार स्वीकारताच ‘काम करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’, असा स्पष्ट संदेश गेल्याचे चित्र आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर लोहार यांनी विभागातील विविध कामांचा आढावा घेतला. शासनाच्या योजना आणि विद्यार्थ्यांशी संबंधित कामांमध्ये हलगर्जीपणा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली. दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण करा आणि कोणतेही प्रकरण विनाकारण प्रलंबित ठेवू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मोफत गणवेशांच्या दर्जाबाबतही शिक्षणाधिकाऱ्यांनी गंभीर भूमिका घेतली आहे. शासनाच्या आदेशानुसार गणवेशाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेला गणवेश निकृष्ट दर्जाचा आढळल्यास संबंधित ठेकेदारासह जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा थेट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
कार्यालयीन कामकाजातील शिस्तीबाबतही लोहार यांनी कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यालयीन कामकाजात वेळकाढूपणा करणाऱ्यांना आता ‘चालढकल’ करता येणार नसल्याचे संकेत पहिल्याच दिवशी मिळाले आहेत. सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शन तसेच निवृत्तीविषयक कामांसाठी त्यांना जिल्हा परिषद कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, याचीही शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची कामे प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
कार्यालयात बसून आढावा नाही; थेट शाळेत धडक
पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लोहार यांनी साखरपा येथील दोन शाळांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. शालेय पोषण आहाराची गुणवत्ता, शैक्षणिक कामकाज आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची त्यांनी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. केवळ कार्यालयीन कागदपत्रांवरून शिक्षण व्यवस्थेचा आढावा न घेता प्रत्यक्ष शाळेच्या पातळीवर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. याचवेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साखरपा परिसरातील शाळांचे त्यांनी कौतुक केले. पदभाराच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे शिक्षण विभागातील कामकाजाला शिस्त लागण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आता आदेश तोंडी राहतात की प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला जातो, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

