(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख-पांगरी मार्गावर एप्रिल महिन्यात घडलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या भीषण अपघाताची अखेर तब्बल तीन महिन्यांनंतर देवरुख पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली आहे. चालू दुचाकीवर मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने नियंत्रण सुटून झालेल्या या दुर्घटनेत हातखंबा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. आवश्यक चौकशी, तांत्रिक तपासणी आणि कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल पडताळणी करून फेटल मोटर अपघात रजिस्टर (क्र. ०५/२०२६) मधील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर बीएनएसएस कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यू क्रमांक २७/२०२६ व २८/२०२६ अशी अधिकृत नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली. ही दुर्घटना २६ एप्रिल २०२६ रोजी देवरुख-पांगरी मार्गावरील पांगरी फाट्याजवळ घडली होती. ज्युपिटर दुचाकीवरून प्रवास करत असताना मोबाईलचा अचानक स्फोट झाला. या अनपेक्षित घटनेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या दगडी मोरीवर आदळली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुमित विलास कांबळे आणि विकास काशिराम कांबळे (दोघेही रा. हातखंबा, जि. रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर या अपघाताची जिल्हाभरात मोठी चर्चा झाली होती. मात्र, तपास प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत पोलीस नोंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला अखेर प्रशासकीयदृष्ट्या पूर्णविराम मिळाला आहे.

