(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीतील राजीवडा समुद्रात रविवारी सकाळी मोठा थरार झाला. लाईट हाऊस परिसरात मच्छीमारी करून राजीवडा जेटीकडे परतणाऱ्या ‘ओशियन पर्ल’ या मासेमारी नौकेला अचानक आलेल्या महाकाय लाटेचा तडाखा बसला. या तडाख्यामुळे नौकेचा समतोल बिघडून ती समुद्रात उलटली आणि बोटीवरील आठही मच्छीमार पाण्यात फेकले गेले. मात्र, त्याच मार्गाने परतणाऱ्या ‘अल सुरया’ बोटीवरील खलाशी आणि सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत सर्व आठ मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २०) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजीवडा येथील ‘ओशियन पर्ल’ ही छोटी मासेमारी नौका आठ खलाशांना घेऊन मच्छीमारीसाठी समुद्रात गेली होती. मच्छीमारी आटोपल्यानंतर सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास नौका राजीवडा जेटीच्या दिशेने परतत होती. लाईट हाऊससमोर नौका आली असताना अचानक समुद्रात प्रचंड लाट उसळली. या लाटेचा जोरदार तडाखा बसल्याने नौकेचा समतोल पूर्णपणे बिघडला आणि काही क्षणांतच ‘ओशियन पर्ल’ समुद्रात उलटली.
नौका उलटल्याने बोटीवरील साद सिकंदर हुसये (२१), मुहाफीस मुजकीर मुकादम (२२), अहमद सुलेमान सोलकर (३८), इम्तियाज मलिक मुजावर (२१), नासिर गफूर हुसये (६०), शोएब नासिर हुसये (३०), इमरान अन्वर डंगी (३५) आणि तौसीफ सुलेमान सोलकर (३५, सर्व रा. राजीवडा, ता. रत्नागिरी) हे आठही जण समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.
याच वेळी त्याच परिसरातून मच्छीमारी करून परतणाऱ्या ‘अल सुरया’ बोटीवरील खलाशांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली बोट दुर्घटनाग्रस्त भागाकडे वळवली. सागर रक्षक दलाच्या सदस्यांसह खलाशांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पाण्यात दोर आणि अन्य सहाय्यक साधने फेकून त्यांनी मच्छीमारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
आपल्या जीवाची पर्वा न करता खालीद इस्माईल होडेकर, अजमल शब्बीर हुनेरकर, कैफ खालीद होडेकर, खलील अली मजगावकर आणि यासीन महमूद पावसकर (सर्व रा. राजीवडा) यांनी मदतकार्य करत एक-एक करून समुद्रात फेकल्या गेलेल्या आठही मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांना ‘अल सुरया’ बोटीवर सुरक्षितपणे घेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आणि राजीवडा किनाऱ्यावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. किनाऱ्यावर आणल्यानंतर सर्व खलाशांची विचारपूस करण्यात आली. आठही मच्छीमार सुखरूप असून वैद्यकीय तपासणीची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.


