(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ यंदा उत्सवमूर्ती वातावरणात होणार असून, १५ जून रोजी राज्यभरातील शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सवा’चा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची घंटा वाजताच हजारो चिमुरड्यांच्या शैक्षणिक प्रवासाची नवी सुरुवात होणार असून, त्यांचे स्वागत एका संस्मरणीय सोहळ्याच्या रूपाने करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या प्रवेशोत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांतील वरिष्ठ सनदी अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील किमान एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शाळेच्या पहिल्या दोन दिवसांत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती शाळांमध्ये दिसून येणार आहे. याचबरोबर, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना नियमित कामकाजाबरोबरच प्रत्येकी एक अतिरिक्त शाळा ‘दत्तक’ देण्यात येणार आहे. वर्षभर या शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा, गुणवत्तेचा आणि भौतिक सुविधांचा सातत्याने आढावा घेतला जाणार आहे.
प्रवेशोत्सव हा केवळ स्वागताचा कार्यक्रम न राहता शैक्षणिक गुणवत्तेच्या बळकटीकरणाचा प्रारंभबिंदू ठरणार आहे. ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा तसेच वार्षिक शैक्षणिक नियोजनाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. ग्रामीण भागात दवंडी पिटवून, तर शहरी व निमशहरी भागात व्हॉट्सऍप समूह, शालेय सूचना फलक आणि विविध माध्यमांतून प्रवेशोत्सवाचा व्यापक प्रचार केला जात आहे. शाळांच्या स्वच्छतेपासून वर्गखोल्यांच्या सजावटीपर्यंत सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
प्रभातफेरी, गुलाबपुष्प आणि ‘पहिले पाऊल’
प्रवेशोत्सवाच्या दिवशी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची वाजतगाजत प्रभातफेरी काढली जाणार आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक नवागत विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. विशेष आकर्षण ठरणार आहे ‘पहिले पाऊल’ ही संकल्पना. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक बालकाच्या पायाचा ठसा कागदावर उमटवून त्याची स्मरणिका पालकांना भेट दिली जाणार आहे. मुलांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस अविस्मरणीय ठरावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि स्नेहभोजन
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच शाळांमधील स्वच्छता, क्रीडा सुविधा, आरोग्यविषयक सवयी, खेळ साहित्य आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (माध्यान्ह भोजन) यांची पाहणी करून अधिकारी आवश्यक सूचना देणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून, शाळेचा पहिला दिवस त्यांच्या आयुष्यातील गोड आठवण बनावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
पहिलीत १० हजार ९१ विद्यार्थ्यांची नोंद
जिल्ह्यात यंदा इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ९१ इतकी असून, इतक्या मोठ्या संख्येने चिमुरडे पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शिक्षण यंत्रणा सज्ज झाली असून, १५ जूनचा दिवस जिल्हा परिषद शाळांसाठी एका उत्सवी पर्वाची सुरुवात ठरणार आहे.

