(चिपळूण / वार्ताहर)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील शिक्षण पतपेढी हॉल, प्रांत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चेडे सूत्रसंचालन करणार असून, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
या मेळाव्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, गावागावांत पक्षाचा विस्तार करणे, जनाधार वाढविणे तसेच समाजावरील अन्याय-अत्याचाराविरोधात प्रभावी लढा उभारण्याबाबत आठवले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, महाराष्ट्र राज्य सदस्य दादासाहेब मर्चेडे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार, मुंबई युवक अध्यक्ष सचिनभाई मोहिते, कोकण प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. उमेश पवार, रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष ॲड. प्रशितोष कदम आणि रत्नागिरी जिल्हा पर्यावरण अध्यक्ष ॲड. सुरेंद्र तांबे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक तसेच आंबेडकरी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.
आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक वाटचाल, गावपातळीवरील संघटन विस्तार आणि कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सकपाळ यांनी सांगितले.

