(मुंबई)
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीची वाट धरली होती. आता निवडणुकीनंतरही पक्षप्रवेशाची मालिका सुरूच असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते उन्मेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उन्मेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
या पक्षप्रवेशाची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी आपल्या सोशल मीडियाद्वारे दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी आज अधिकृतपणे शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अनेक पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश
उन्मेश पाटील यांच्यासोबत विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. यात पंचायत समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, कॉंग्रेस चे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, चिरागउद्दीन शेख, गणेश महाले यांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
याशिवाय दीपक देशमुख, सुबोध वाघमारे, विजू गवळी, संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहित खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन महायुती सरकारने पूर्ण केले आहे. शिवसेना हा सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे नेणारा पक्ष असल्याने राज्यभरातून रोज शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील चौधरी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
उन्मेश पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांनंतर सुरू झालेल्या पक्षांतराच्या राजकारणाला या घटनेने आणखी वेग मिळणार आहे.

