(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघातील करक धरण परिसराची आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग तसेच परिसरातील सद्यस्थितीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
सध्या कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धरण परिसरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी प्रशासनाला दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत व बचावकार्य सुरू करता यावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
धरणातील पाण्याची पातळी आणि विसर्ग यांचे नियमित निरीक्षण करावे. परिसरातील परिस्थितीत कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती तातडीने संबंधित यंत्रणांना द्यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणांची तयारी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, नागरिकांनी अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी केले.

