(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) टेलिफोन एक्सचेंज इमारतीमध्ये अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून लाखो रुपयांच्या किमतीचे साहित्य लंपास केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र, या कथित चोरीला अद्याप पोलिस किंवा बीएसएनएल प्रशासनाकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एक्सचेंज इमारतीच्या दर्शनी भागातील दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात व्यक्तींनी आत प्रवेश केल्याची चर्चा आहे. चोरी केल्यानंतर संबंधितांनी दरवाजा उघडाच ठेवून तेथून पोबारा केल्याचेही सांगितले जात आहे. हा प्रकार तीन ते चार दिवसांपूर्वी घडल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
मात्र, या कथित घटनेत नेमके कोणते साहित्य चोरीला गेले, त्याची किंमत किती आहे आणि इमारतीचे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे चोरीच्या चर्चेमागील नेमके वास्तव काय, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
रफिक मार्टमधील चोरीनंतर सरकारी इमारतीतील चर्चेने चिंता
काही दिवसांपूर्वीच संगमेश्वर परिसरातील कसबा येथील मुख्य रस्त्यालगत आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘रफिक मार्ट’मध्ये चोरीची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता सरकारी यंत्रणेच्या इमारतीत चोरी झाल्याची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांत अद्याप तक्रार दाखल नाही
या संदर्भात संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी अद्याप कोणतीही लेखी किंवा अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे चोरीची घटना प्रत्यक्षात घडली असल्यास बीएसएनएल प्रशासनाने पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रार दाखल न करण्यामागे काही तांत्रिक कारण आहे की प्रशासनाकडून अंतर्गत पातळीवर पडताळणी सुरू आहे, याबाबतही स्पष्टता झालेली नाही.
सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार का?
दरम्यान, एक्सचेंज इमारत किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का, असल्यास त्यामध्ये संशयित व्यक्तींच्या हालचाली कैद झाल्या आहेत का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्यास कथित घटनेचे वास्तव समोर येण्यास मदत होऊ शकते.
सध्या बीएसएनएलच्या स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे टेलिफोन एक्सचेंजमध्ये प्रत्यक्ष चोरी झाली आहे की चोरीची केवळ चर्चा आहे, हे बीएसएनएल प्रशासन अथवा पोलिसांच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे.

