(जैतापूर / राजन लाड)
भारतीय संगीत कलापीठच्या वतीने आयोजित पखवाज वादनाच्या प्रथमा आणि द्वितीया स्तराच्या परीक्षांसाठी राजापूर तालुक्यातील १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ (आंदूरले) येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालय येथे पार पडत आहेत.
या विद्यार्थ्यांनी फ्लॅश आर्ट अकॅडमी, राजापूर यांच्या माध्यमातून पखवाजचे प्रशिक्षण घेतले असून, प्रशिक्षक तन्मय परब यांनी तयारी करून घेतली. कोकणातील एकमेव परीक्षा केंद्र असलेल्या कुडाळ येथे हे विद्यार्थी पखवाज वादनाच्या परीक्षेसाठी दाखल झाले होते.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रशिक्षक तन्मय परब, फ्लॅश आर्ट अकॅडमीचे संचालक राकेश दांडेकर, राजन लाड आणि अरविंद लांजेकर यांनी मार्गदर्शन व साथ दिली.
परीक्षा केंद्राचे संचालक आणि अलंकार पदवीप्राप्त श्री. महेश सावंत यांनी सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील संगीतप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम राजापूरातील सांस्कृतिक व शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.