(मुंबई / वृत्तसंस्था)
रत्नागिरीतील भगवती बंदर येथे अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कोकणातील सागरी पर्यटनासह स्थानिक रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
भगवती बंदर येथे क्रूझ टर्मिनल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर झळकणार
मंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकणची नैसर्गिक संपन्नता, विस्तीर्ण समुद्रकिनारा, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता लक्षात घेता भगवती बंदर येथे विकसित होणारे क्रूझ टर्मिनल राज्याच्या सागरी पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. परिणामी रत्नागिरीचे पर्यटन जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे येण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हॉटेल, वाहतूक, पर्यटनासह स्थानिक व्यवसायांना फायदा
क्रूझ टर्मिनलमुळे रत्नागिरी आणि परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, हस्तकला, मत्स्यव्यवसाय तसेच विविध लघुउद्योगांना या प्रकल्पाचा थेट आणि अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. स्थानिक व्यावसायिकांसाठी नव्या व्यवसायाच्या संधी निर्माण होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. त्यामुळे क्रूझ टर्मिनल हा केवळ पर्यटन प्रकल्प न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरेल, असे राणे यांनी सांगितले.
प्रशासकीय मंजुरी; पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू
प्रकल्पाची सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यावरणीय मंजुरीसह अन्य आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
दरम्यान, प्रकल्पाचा टेक्नो-इकॉनॉमिक फिजिबिलिटी स्टडी (TEFS) पूर्ण झाला असून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्राधान्य
मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाशी संबंधित सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतानाच आधुनिक सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या तत्त्वांचा समतोल राखून भगवती बंदर क्रूझ टर्मिनलचा विकास करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
कोकणच्या सागरी पर्यटनाला मोठी संधी
भगवती बंदर येथील क्रूझ टर्मिनल विकसित झाल्यास रत्नागिरीला क्रूझ पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक पर्यटनस्थळे, खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि स्थानिक व्यवसायांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

