(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
साडवली (नैदरवाडी) येथील एका खाजगी विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने अत्यंत शिताफीने आणि धाडसी पद्धतीने सुटका करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून वन विभागाच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आज (बुधवारी, दि. ५) सकाळी सुमारे नऊच्या सुमारास राजेश परशुराम चव्हाण यांच्या साडवली (नैदरवाडी) येथील खाजगी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर–देवरुख आणि त्यांच्या पथकाने आवश्यक बचाव साहित्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पाहणीत संबंधित विहीर सुमारे ५ बाय १२ फूट आकाराची आणि जवळपास २० फूट खोल असल्याचे आढळले. विहिरीत पडलेला बिबट्या विहिरीच्या भिंतीचा आधार घेत पाण्यात पोहत स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होता. परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर वन विभागाच्या पथकाने लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून तो विहिरीत उतरविला. काही क्षणांतच बिबट्या पिंजऱ्यात शिरताच त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले.
ही संपूर्ण बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सुरज तेली, सुप्रिया काळे तसेच प्राणीमित्र अनुराग आखाडे यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. बचावकार्यावेळी साडवलीचे पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनीही मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, वन्यप्राणी विहिरीत पडणे अथवा अन्य कोणत्याही संकटात अडकण्याची घटना घडल्यास नागरिकांनी स्वतः बचावाचा प्रयत्न न करता तात्काळ वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

