(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा महामार्गावरील तळेकांटे, गणेश मंदिराजवळ एका महिलेला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना गुरुवार ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास घडली.याची फिर्याद भारती भार्गव कळंबटे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली असुन या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात गु.र.नं. १३१/२०२५ असा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याने संगमेश्वर पोलिसांपुढे तपासाचे आवाहन उभे केले आहे.
फिर्यादी श्रीमती भारती भार्गव कळंबटे (वय ५८, रा. तळेकांटे, चटकवाडी) या पायी घरी जात असताना निळसर-काळ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या एका अज्ञात पुरुष व महिलेने त्यांना रस्त्यापलीकडे बोलविण्याचा इशारा केला. त्यानंतर त्या वाहनातील पुरुष खाली उतरून “रस्ता कुठे जातो” अशी विनम्रपणे विचारपूस करत जवळ आला व क्षणातच फिर्यादींच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची असलेली एक लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून रस्त्याच्या पलीकडे उभी करून ठेवलेल्या चारचाकी गाडीत बसून मुंबईच्या दिशेने पुन्हा फिल्मीस्टाईल वेगाने गाडी पळवली.
घटनेनंतर फिर्यादींनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. रात्री २३.१६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत नोंदवण्यात आला असून संगमेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्याने उभे केलेले आव्हान स्वीकाराले असून जोमाने तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.

