(रत्नागिरी / वार्ताहर)
कोकणच्या जीवनाशी समुद्राचे अतूट नाते आहे. रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था, मच्छीमारी, पर्यटन, स्थानिक संस्कृती आणि हजारो कुटुंबांची उपजीविका समुद्राशी जोडलेली आहे. त्यामुळे समुद्र आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे ही केवळ पर्यावरण संवर्धनाची बाब नसून सामाजिक, आर्थिक आणि भावी पिढ्यांशी संबंधित सामूहिक जबाबदारी आहे. याच भूमिकेतून सागरी सीमा मंच, रत्नागिरी यांच्या पुढाकाराने सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, मच्छीमार, युवक आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ‘स्वच्छ सागर अभियान’ राबविण्यात येत आहे.
सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी जागतिक किनारपट्टी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने कोस्ट गार्ड आणि भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयांच्या माध्यमातून देशभर किनारपट्टी स्वच्छता अभियान राबविले जाते. सन २०२२ पासून सीमा जागरण मंचाच्या माध्यमातून देशभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोकण प्रांतात सागरी सीमा मंच आणि सहयोगी संस्था या अभियानाला व्यापक जनसहभागाचे स्वरूप देत आहेत.
‘स्वच्छ सागर’ या संकल्पनेचा उद्देश केवळ समुद्रकिनाऱ्यावर पडलेला कचरा उचलण्यापुरता मर्यादित नाही. कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच रोखणे, त्याचे योग्य वर्गीकरण करणे, पुनर्वापर आणि पुनर्चक्रणाला चालना देणे तसेच नागरिकांच्या दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल घडविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
समुद्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ शासन किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेची नसून मच्छीमार, स्थानिक नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, पर्यटक, ग्रामपंचायत, नगरपालिका तसेच सामाजिक आणि पर्यावरण संस्थांनी एकत्रितपणे ती स्वीकारणे आवश्यक आहे. या सामूहिक सहभागातूनच समुद्र आणि किनारपट्टीचे दीर्घकालीन संवर्धन शक्य होणार आहे.
दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांमधील एकूण २० समुद्रकिनाऱ्यांवर १९ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्रकिनारी १९ सप्टेंबर रोजी कोस्ट गार्ड आणि शासनाच्या विविध विभागांच्या सहभागातून स्वतंत्रपणे अभियान राबविण्यात येणार असून, त्यात सागरी सीमा मंचाचा सक्रिय सहभाग असणार आहे. विविध संस्थांच्या गौरी-गणपती विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी, २० सप्टेंबर रोजी मांडवी किनाऱ्यावरही सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशीनंतर २६ सप्टेंबर रोजी पांढरासमुद्र, नांदिवडे आणि संदखोल (जयगड), वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिऱ्या-शिवलकरवाडी, मिऱ्या-पाटीलवाडी, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी तसेच राजापूर तालुक्यातील वेत्ये, कशेळी, आंबोळगड आणि नाटे या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती, विविध महाविद्यालये, शाळा, सामाजिक संस्था आणि मंडळांच्या सहभागातून अभियान राबविण्यात येणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या कचऱ्याचे अनेक स्रोत आहेत. घरगुती प्लास्टिक, खाद्यपदार्थांची पाकिटे, बाटल्या, थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या आणि इतर घनकचरा नाल्यांमधून किंवा पावसाच्या पाण्याबरोबर समुद्रात पोहोचतो. मासेमारी व्यवसायातील जुनी जाळी, दोर, प्लास्टिक क्रेट, पॅकिंग साहित्य आणि अन्य वस्तूही समुद्री कचऱ्याचा भाग बनतात. नदी, खाडी आणि ओढ्यांमधून वाहून येणारा कचरा, समुद्रकिनारी पर्यटनामुळे निर्माण होणारा कचरा तसेच काही ठिकाणी होणारे अनधिकृत कचरा टाकणे हीदेखील महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे केवळ किनारा स्वच्छ करण्याऐवजी कचरा निर्माण होण्याचा आणि समुद्रात पोहोचण्याचा स्रोत शोधून त्यावर नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
अभियानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून संबंधित समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करण्यात येत आहे. कचऱ्याचे प्रमुख हॉटस्पॉट, कचऱ्याचे प्रकार, त्याचे संकलन आणि विल्हेवाट याबाबत नियोजन केले जात आहे. स्वच्छता साहित्य, हातमोजे, कचरा संकलन पिशव्या, कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची व्यवस्था आणि संकलित कचऱ्याच्या वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे.
समुद्र स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील विविध व्यक्तींची अभियानासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. स्वच्छता अभियान समितीचे प्रमुख श्री. संजीव लिमये, तर स्वच्छता अभियान सहप्रमुख श्री. सुहास ठाकूर देसाई असणार आहेत. याशिवाय अभियान राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्यासाठी ‘किनारा (बीच) प्रमुख’ निश्चित करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध विभागांशी संपर्क साधण्यात आला असून, समाजातील विविध संस्था आणि घटकांशी प्रत्यक्ष संपर्क करून त्यांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
‘कचरा समुद्रात जाऊ देऊ नका’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे हे अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. केवळ एका दिवसाची किनारा स्वच्छता हा समुद्री कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुरेसा नाही. कचरा समुद्रात जाण्यापासून रोखणे, नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडविणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सिंगल आणि एकूणच प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच समुद्रकिनाऱ्याबाबतची सामूहिक जबाबदारी ओळखणे, या दिशेने अभियानातून जनजागृती करण्यात येणार आहे.
‘स्वच्छ सागर अभियान’ाचा खरा उद्देश एका दिवसात हजारो किलो कचरा उचलणे एवढाच नसून, वर्षभर समुद्रात कचरा जाणार नाही, अशी व्यवस्था आणि सामाजिक सवय निर्माण करणे हा आहे. रत्नागिरीच्या समुद्राशी नागरिकांचे नाते केवळ आर्थिक नसून भावनिक आणि सांस्कृतिकही आहे. त्यामुळे ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर; स्वच्छ किनारा, समृद्ध कोकण’ हा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून हे अभियान व्यापक लोकसहभागातून पुढे नेण्यात येणार आहे.


