(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कथित ‘३९ (ब)’ प्रकरणातील आदेशांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, तसेच विजय विरुपाक्ष शिरोलकर यांच्या बदलीबाबत फेरविचार करावा, या मागण्यांसाठी जलसंधारण विभागाच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेले सौ. शुभांगी विजय शिरोलकर व त्यांच्या कुटुंबीयांचे ठिय्या आंदोलन अखेर आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. ‘३९ (ब)’ प्रकरणावर येत्या ३० दिवसांत नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
शिरोलकर कुटुंबीयांनी गेल्या आठ दिवसांपासून जलसंधारण विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ‘मुंबई वित्तीय नियम ३९ (ब)’च्या कथित गैरवापराबाबत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, संबंधित प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी आणि आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. या आंदोलनादरम्यान शिरोलकर कुटुंबीयांनी कार्यकारी अभियंता धनंजय साहूत्रे यांच्याकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकरणावर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्याचे यापूर्वी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने अखेर त्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता धनंजय साहूत्रे यांनी शुभांगी शिरोलकर यांना दिलेल्या पत्रात त्यांच्या मागण्यांबाबत जलसंधारण आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी चर्चा झाल्याचे नमूद केले होते. विजय शिरोलकर यांच्या बदलीबाबत प्रचलित शासकीय नियमांनुसार कार्यवाही झाल्याने त्यावर फेरविचार करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, ‘३९ (ब)’ प्रकरणाबाबत प्रचलित नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आता ३९ (ब) प्रकरणावर ३० दिवसांच्या कालावधीत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने शिरोलकर कुटुंबीयांनी आठ दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, चौकशीची व्याप्ती काय असते आणि संबंधित प्रकरणात नेमकी कोणती प्रशासकीय कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.


