(रत्नागिरी / वार्ताहर)
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळेचा उल्लेखनीय शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक (नागपूर) यांच्या उपकेंद्र असलेल्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात शिक्षण, संस्कृती आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांचाही गौरव करण्यात आला. वेदपाठशाळेच्या वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रामलोचन ठाकूर आणि वेदपाठशाळेचे प्राचार्य कीर्तीकुमार भोसले यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेला ‘गोवेश्वर महिमा संहिता’ हा ग्रंथ अध्ययनासाठी भेटस्वरूप देण्यात आला.
१५ वर्षांपासून वेद आणि पौरोहित्याचे विनामूल्य शिक्षण
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र नाणीज येथे स्थापन झालेली आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळा गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहे. या वेदपाठशाळेत हिंदू समाजातील सर्व जातीतील विद्यार्थ्यांना वेद आणि पौरोहित्याचे विनामूल्य शिक्षण दिले जाते.
आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण पूर्ण केले असून, ते समाजात वेद, धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य करीत आहेत. अनेक विद्यार्थी पौरोहित्याच्या माध्यमातून स्वावलंबी होत स्वतःचा चरितार्थ चालवत आहेत. त्यामुळे वेदपाठशाळा केवळ धार्मिक शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रोशन अलोने, साहित्य विभागाच्या अधिष्ठाता प्रा. कविता होले, वेद व व्याकरण विभागाचे अधिष्ठाता प्रा. हरेकृष्ण अगस्ती, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी आणि रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले. कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वेद, संस्कृत आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासोबतच विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या नाणीज येथील वेदपाठशाळेच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

