(राजापूर / तुषार पाचलकर)
जलद वाढ, विविधांगी उपयोग, कमी देखभाल आणि वाढती बाजारपेठ यामुळे बांबू शेतीकडे शेतकऱ्यांनी दूरदृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकणातील लाल मातीत बांबू शेतीचा अभिनव प्रयोग राबवत शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची नवी दिशा देण्याचे काम समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षा राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या पुढाकाराने सुरू आहे.
दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बांबू शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवड, आधुनिक तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील व्यावसायिक दृष्टिकोनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, यासाठी त्यांना चंद्रपूर येथे प्रशिक्षणासाठी नेण्यात आले होते.
शेतकऱ्यांना बांबू क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच बांबू शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता यावे, या उद्देशाने समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने हा प्रशिक्षण उपक्रम राबविला. शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करत राजश्री (उल्का) विश्वासराव यांनी बांबू क्षेत्रात भरीव काम उभे करण्याचा संकल्प केला आहे.
जागतिक बांबू दिनानिमित्त राजापूर तालुक्यातील पाचल येथे बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंच्या विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले. या उपक्रमाला बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा राजश्री विश्वासराव, तुषार विश्वासराव, अनंत कोलते, विलास नारकर, भामिनी सुतार यांच्यासह बांबू लागवडीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.


