(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा केळये भिमोद्यान येथे जिल्हा संस्कार विभाग, रत्नागिरी तालुका शाखा आणि भिमोद्यान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी अशोका विजया दशमी, धम्मचक्र परिवर्तन दिन आणि वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण”पंचशील ध्वजारोहण” करून आणि बोधिवृक्षाला वंदन करून करण्यात आली. त्यानंतर विहारातील विधिवत कार्यक्रम शाखेचे विद्यमान अध्यक्ष आयु. अनिल चवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संस्कार विभागाचे प्रमुख आयु. संजय कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
वर्षावास कार्यक्रमाचे प्रवचनकार आयु. विजय जाधव यांनी मार्गदर्शन करताना आजच्या बौद्ध समाजातील युवक युवतींनी धम्म संस्कार पुढे नेण्यासाठी स्वतः संस्कारी होणे आवश्यक असल्याचे सांगून विविध संस्कार शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. संघटना केवळ कार्यकर्त्यांवर चालत नाही. प्रत्येक सभासदाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगताना भिमोद्यान येथील कार्यक्रमाची उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केले आणि संघटनेला धन्यवाद दिले.
सदर कार्यक्रमास संजय कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजाला संघटित राहून धम्मकार्य पुढे नेण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रमुख प्रवचनकार विजय जाधव, संस्कार विभाग प्रमुख संजय कांबळे यांचेसह भिमोद्यान संघटनेचे अध्यक्ष अनिल चवेकर, सचिव मनोज जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण पवार, पोलीस पाटील आयु. अशोक केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव मनोज जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे कार्यकर्ते व सर्व सभासदांनी मेहनत घेतली.