(खेड)
उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वरवली गावठण वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत रांजण डोहावर वनराई बंधारा उभारला आहे. या बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार असून परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यासही मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि तरुणांनी गेल्या अनेक दिवसांपासून श्रमदान केले. शासनाने पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा योग्य उपयोग व्हावा यासाठी नदी व नाल्यांवर वनराई बंधारे उभारण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत वरवली गावठण वाडीतील ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन हा बंधारा पूर्ण केला.
लोकसहभागातून पाणीटंचाईवर मिळवलेला हा तोडगा प्रेरणादायी ठरत असून या उपक्रमाबद्दल वरवली गावठण वाडीतील ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

