(देवरुख)
आंबव (देवरुख) येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “सॅप टेक्नॉलॉजी आणि त्यामधील रोजगार संधी” या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग येथील उत्कर्ष फाऊंडेशन या नामांकित संस्थेच्या कंपनीच्या तज्ञांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जवळपास शंभर विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष श्री. रविंद्रजी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. अनिरुद्ध जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्कर्ष फाऊंडेशनचे टेक्निकल अॅडवायझर, विलास सुनंदा रामचंद्र कुबल तसेच प्रकाश बागल, दिलेंद्र शिरधनकर, महेश कोरे, राहुल पाटील यांचे श्री. रविंद्रजी माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर डॉ. जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सॅप टेक्नॉलॉजीबाबत मुलभूत माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
यानंतर दिलेंद्र शिरधनकर यांनी विद्यार्थ्याना सॅप सॉफ्टवेअरबद्दल मुलभूत माहिती सांगितली. तसेच या ईआरपी सॉफ्टवेअरचे इंडस्ट्रीमधील महत्व आणि रोजगारासाठीची त्याची उपयुक्तता विषद केली. आपल्या संस्थेची माहिती देताना उत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले तसेच सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली असल्याचे जाहीर केले.
यानंतर प्रकाश बागल व राहुल पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले कि विद्यार्थ्यांना सॅप सारखी सॉफ्टवेअर शिकून रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यांनी इंटरव्ह्यू साठी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे तयार करावे याची माहिती दिली. तसेच परीक्षेतील मार्कांव्यतिरिक्त हमखास रोजगार मिळवून देणारे टेक्निकल कोर्सेस जास्तीतजास्त शिकण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
संस्थाध्यक्ष श्री. रविंद्र माने यांनी उत्कर्ष फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला व महाविद्यालयामध्ये नव्याने सुरु होणारया या कोर्सचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. SAP या विषयाची माहिती आपल्या कोकणातील मुलांना मिळावी याकरता विलास कुबल यांनी व्यक्तिशः मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला तसेच उत्कर्ष फाउंडेशन यांना सदरच्या कार्यक्रमासाठी कळकळीची विनंती केली.
यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी मान्यवरांचे आभार मानले तसेच इंडस्ट्रीमध्ये सध्या ईआरपी आणि त्यासंबंधित सॉफ्टवेअरना फार महत्व प्राप्त झाले असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ते शिकून घेण्याची गरज बोलून दाखवली.